का जगायचं? - पु.ल.
पुलं चे नातेवाईक, चंदू ठाकूर हे हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान-अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं. त्या पत्राचे पुलंनी लिहिलेल्या उत्तराचा काही भाग.. जीवन का जगावं इथपासून त्यातला सगळ्यात मोठा आनंद कुठला इथवर सगळं सगळं अगदी अलगद गाठ सोडल्यासारखे पुलं इथे सांगतात ! १० जुलै १९५७, प्रिय चंदू. तुला वाटतं "मी फ्लाईंग का करावं?" – चंदू, अरे कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तर फूल म्हणजे काय असतं रे? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आ...